महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । कोरोना महामारीची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असली तरी महागाईची लाट मात्र कायम आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 25 रुपयांनी वाढ झाली असून, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चक्र सुरूच आहे. महागाईच्या भडक्यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त झाली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र पेट्रोल प्रतिलिटर 102 ते 105 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल शंभरीच्या उंबरठय़ावर आहे. जून महिन्यात पेट्रोल तब्बल 8 रुपयांनी तर डिझेल साडेआठ रुपयांनी महागले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पिंमती वाढण्याची शक्यता असून, ‘ओपेक’ या निर्यातदारांच्या संघटनेच्या उद्या (दि. 2) होणाऱया बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकन क्रूड ऑईल 75 डॉलर्स तर, ब्रेंट क्रूड ऑईल 76 डॉलर्स प्रति बॅरलवर गेले आहे.
पाच महिन्यांत सिलिंडर 150 रुपयांनी महागला
# 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या पिंमतीत गुरुवारपासून 25 रुपये 50 पैशांनी वाढ केली. तर, 19 किलो सिलिंडर 76 रुपयांनी महागला. गेल्या पाच महिन्यात झालेली ही पाचवी दरवाढ आहे. पाच महिन्यात सिलिंडर तब्बल 150 रुपयांनी महाग झाले.
# 4 फेब्रुवारीला 25 रुपयांनी दरवाढ केली. त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपये, 25 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पुन्हा 25 रुपयांनी महागले. आता 25 रुपयांनी दरवाढ केली आहे.