महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । डिजिटल स्वाक्षरी, शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) घरबसल्या परीक्षा सेवा सुरू केल्यानंतर लवकरच लायसन्सची दुय्यम प्रत (डुप्लीकेट) आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे. या दोन सेवांच्या कागदपत्रे पडताळणी आणि अर्जासाठी सध्या आरटीओत जावे लागते. हा खटाटोप वाचवण्यासाठी आधार कार्ड लिंक करून त्याची पडताळणीही ऑनलाइनच होणार आहे. या सेवेवर परिवहन विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (एनआयसी)काम सुरूआहे.
पक्के लायसन्स हरविल्यास त्याची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी पोलिसांचा अहवाल किं वा लायसन्स खराब झाल्यास आधीच्या लायसन्सची प्रत व अन्य कागदपत्रे लागतात. जर पत्ता बदलायचा असल्यास तसा अर्जही भरावा लागतो. दुय्यम प्रत मिळवण्यासाठीची सेवा ऑनलाइन आहे. ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात. परंतु ती अपलोड के ल्यानंतर त्याची पुन्हा प्रिंट काढून त्याच्या पडताळणीसाठी आरटीओत यावे लागते. त्यानंतर लायसन्सची दुय्यम प्रत घरपोच येते. लायसन्स नूतनीकरणासाठीही अशीच सेवा आहे. त्यामुळे ऑनलाइन सेवा के ल्यानंतरही त्याच्या पडताळणीसाठी वाहनचालकाला आरटीओच्या खेपा माराव्या लागतात. त्यात बराच वेळ जातो.
यातून वाहनचालकाची सुटका करण्यासाठी लायसन्सच्या दुय्यम प्रत सेवा आणि लायसन्स नूतनीकरणाची सेवा पूर्णपणे ऑनलाइनच करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी एनआयसीची मदत घेतली जात आहे. यात दोन्ही सेवांना सध्या आधार कार्ड लिंक करता येत नाही. ऑनलाइन सेवेत आधार कार्ड लिंक करावे लागेल. ती प्रक्रि या होताच ओटीपी मिळेल. ओटीपी भरताच पुढील प्रक्रि या करावी लागेल. आधार कार्डमुळे त्या चालकाची सर्व योग्य आणि खरी माहिती आरटीओला उपलब्ध होईल. त्यामुळे पडताळणी करणे शक्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी चालकाला आरटीओत यावे लागणार नाही.
लायसन्स दुय्यम प्रत आणि लायसन्स नूतनीकरण सेवा ऑनलाइन जरी असल्या तरीही कागदपत्रे पडताळणी व अर्ज करण्यासाठी वाहनचालकाला आरटीओत यावे लागते. ऑनलाइन सेवेत यापुढे आधार कार्ड लिंक करावे लागेल आणि भ्रमणध्वनी क्र मांक व अन्य माहिती, कागदपत्रे भरल्यानंतर पडताळणी होईल. त्यामुळे आरटीओत यावे लागणार नाही. यासंदर्भात एनआयसीसोबत काम सुरू आहे. आरटीओच्या विविध प्रकारच्या ११० सेवा असून आतापर्यंत ८३ सेवा ऑनलाइन झाल्या आहेत.
अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त