सप्टेंबर महिन्यापासून लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाची लस मिळण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो, असे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले होते. पण, सप्टेंबरपूर्वीच ‘झायडस कॅडिला’च्या कोरोना लसीच्या चाचणीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. चाचणीत लस यशस्वी ठरली, तर ती लहान मुलांसाठी वापरता येऊ शकते, असे ‘एनडीटीव्ही’ न्यूज चॅनलशी बोलताना डॉ. अरोरा यांनी म्हटले आहे.येत्या सप्टेंबर महिन्यापासून भारतात १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांना लस उपलब्ध होऊ शकते. लवकरच लहान मुलांसाठी ‘झायडस कॅडिला’ या कंपनीची कोरोना लस उपलब्ध होऊ शकते, असे मत केंद्र सरकारने लसीकरणावर गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केले आहे.

लवकरच झायडस कॅडिला लसीला आपातकालीन वापराची मंजुरी दिली जाऊ शकते, अशी आशा डॉ. अरोरा यांनी व्यक्त केली आहे. ‘झायडस कॅडिला’सोबतच देशात ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचीही लहान मुलांसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या चाचणीचे निकालही हाती येतील. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला देशात सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अर्थात, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी फेटाळूनही लावली आहे. परंतु, याबाबतीत कोणतीही हलगर्जीपणा महागात पडू शकतो, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळेच देशात शाळा आणि कॉलेज सुरू करण्याच्या मुद्यावरही गंभीरतेने निर्णय घेतला जात आहे.
नुकत्याच देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एका आरोग्य पायाभूत सुविधांच्या पॅकेजवर तयारी करत आहे. देशभरात याद्वारे ७३६ जिल्ह्यांत पेडियाट्रिक सेंटर उभारले जाणार आहेत, तसेच लहान मुलांसाठी ४००० आयसीयू बेडचीही व्यवस्था केली जाणार आहे. हे पॅकेज येत्या नऊ महिन्यांत लागू केले जाईल. दिल्ली, महाराष्ट्रासहित अनेक राज्य सरकारही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांना धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *