अमृत’ योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी काढलेली निविदा संशयास्पद ; आमदार अण्णा बनसोडे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ३ ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपींग स्टेशन बांधणे, मलवाहिन्यांचे जाळे उभारणे याकामी तब्बल १२२ कोटी २९ लाख ४८ हजार ७४० रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. एवढ्या मोठ्या कामासाठी निविदा विक्रीचा कालावधी ४५ दिवसांचा ठेवण्यात आला होता. त्यानंतर हाच कालावधी प्रशासनाने २८ दिवसांचा केला आहे, ही बाब संशयाला वाव देणारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्यदायी भविष्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) निविदेतील अटी-शर्ती ठेकेदारासाठी बदलण्यात आल्याचीदेखील चर्चा आहे. परंतु, या अमृत’ योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी काढलेली निविदा पारदर्शीपणे राबविण्यात यावी, अशी मागणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

सदर निवेदनात बनसोडे यांनी म्हटले आहे की, राजकीय लागेबांधे असलेल्या ठेकेदाराच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका निविदा प्रक्रिया राबवत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे ठरणार नाही. वास्तविक, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुधारणा अभियानांतर्गत (अमृत) महापालिका हद्दीत मलनि:सारण व्यवस्था प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर योजनेतील मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपींग स्टेशन उभारण्याचे काम कायदेशीर बाबींमुळे पूर्ण झालेले नाही, याबाबत संबंधितांवर ठोस कारवाई होणे अपेक्षीत आहे.

शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेत ठेकेदाराच्या मदतीला अधिकाऱ्यांबरोबरच सल्लागार कंपनीदेखील असलेल्याची शंका आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या करातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग एका ठेकेदाराच्या भल्यासाठी करण्याचा हा प्रकार आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

याबाबत महापालिका प्रशसानाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी योग्य ती चौकशी करावी. चौकशीत दोषी आढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केलेली आहे.

प्रतिक्रिया…
महापालिका प्रशासनाने विशिष्ठ ठेकेदाराच्या हितासाठी निविदा प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आमच्या मागणीचा सकारात्मक विचार होईल, ही अपेक्षा!

अण्णा बनसोडे,
आमदार, पिंपरी विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *