महाराष्ट्र २४ – काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हावी यासाठी मध्यस्थी करायला तयार असल्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अंतानिओ गुतेरस यांनी म्हटलं आहे. परंतु काश्मीरप्रश्नी कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही असं भारताने स्पष्ट केलं आहे.
काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाप्रकरणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतानिओ गुतेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करून संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे.
अंतानिओ गुतेरस संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस झाल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आले आहेत. रविवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांची भेट घेतल्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांमधील तणाव निवळावा यासाठी उपाययोजना केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, “दोन्ही देशात चर्चा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवला आहे. मात्र याकरता दोन्ही देशांची सहमती आवश्यक आहे. शांतता आणि स्थिर वातावरण चर्चेच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकतं.
संयुक्त राष्ट्रांची सनद आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाअंतर्गत दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून संवाद साधावा. यासंदर्भात आम्ही मध्यस्थी करू शकतो. मात्र त्यासाठी दोन्ही देश एकमत असणं आवश्यक आहे”.
भारताने प्रस्ताव नाकारला
भारताने गुतेरस यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, “भारताची भूमिका कायम आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. काश्मीरच्या ज्या भागावर पाकिस्तानने अवैध आणि जबरदस्तीने कब्जा केला आहे त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. अन्य काही मुद्दा असेल तर दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकते. काश्मीरप्रश्नी कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.
भारतात दहशतवाद फैलावण्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तानचं जे चाललं आहे ते बंद व्हावं याकरता संयुक्त राष्ट्र संघटना पुढाकार घेईल अशी आशा असल्याचं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे.