महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै ।आयसीसी टी -20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान (Omam) मध्ये खेळला जाणार आहे. यासाठी तयारी सुरू झाली आहे. युएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपचे पहिले सहा पात्रता सामने ओमानमध्ये खेळले जातील, तर उर्वरित सहा सामने दुबईच्या ओव्हल स्टेडियमवर खेळले जातील.
मुख्य फेरीचे सामने युएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबीचे शेख झायेद स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या तीन मैदानावर होतील. इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) उर्वरित सामने टी-20 विश्वचषकाच्या अगोदर खेळवले जातील. अशा प्रकारे, जे खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतील त्यांना या मेगा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
टी -20 वर्ल्ड कप दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिल्या फेरीत गट-अ मधील श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स आणि नामीबिया आणि बांगलादेश, ग्रुप बी मधील ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड यांचा सामना होणार आहे. दोन्ही गटातील पहिले दोन संघ सुपर -12 फेरीत प्रवेश करतील. त्याचे प्रारंभिक सहा सामने ओमानमध्ये आणि त्यानंतरचे सहा सामने दुबईच्या ओव्हल स्टेडियमवर खेळले जातील. अशा प्रकारे, मुख्य स्टेडियममध्ये आयपीएलनंतर टी -२० विश्वचषकातील इतर सामन्यांची तयारी होऊ शकते.