…अन् सर्पमित्र खैरे यांनी राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें संदर्भात माथेरानमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला .

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये करण्यात आलं. राज ठाकरे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाला भेट देणार असल्याने त्यांच्या अनेक समर्थकांबरोबरच प्राणी प्रेमींनीही आज येथे हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी या उद्यानाची सविस्तर माहिती घेण्याबरोबरच प्राणीप्रेमींशी चर्चाही केली. तेव्हाच चर्चेदरम्यान सर्पमित्र असणाऱ्या नीलम कुमार खैरे यांनी राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात माथेरानमध्ये घडलेला एक किस्सा सांगितलं.

खैरे यांनी राज ठाकरेंना एक जुना किस्सा सांगताना बाळासाहेबांनी कशाप्रकारे एका सापाचे प्राण वाचवले याबद्दलची माहिती दिली. “बाळासाहेब एकदा माथेरानला आले होते तेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही नव्हता पण तुमची बहीण आणि आई होती. तसेच उद्धव ठाकरेही होते. ते तेव्हा ११ वर्षांचे होते. माझ्या इथे साप बघून ते तिथून दोन किलोमीटरवर असणाऱ्या पॅनरोमा पॉइण्टवर जाणार होते. तिथे जाताना बाळासाहेबांना काही घोडेवाले साप मारताना दिसले. बाळासाहेब तिथे गेले. बाळासाहेबांनी घोडेवाल्यांना, काय करता सरका बाजूला व्हा म्हणतं आपल्या खिशातून रुमाल काढून तो साप पकडला. त्यानंतर ते पॅनरोमा पॉइण्टवर न जाता परत माझ्याकडे आले,” असं खैरे म्हणाले.

पुढे बोलताना खैरे यांनी, “हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे असं म्हटलं. मी हात पुढे केला. त्यांनी माझ्या हातावर साप टेकवला तर तो फुरसुंग प्रजातीचा साप होता. मी बाळासाहेबांना म्हटलं, आहो बाळासाहेब, हा विषारी नाग आहे,” असं सांगितलं. त्यावर बाळासाहेबांनी खैरे यांना, “त्याने मला काही केलेलं नाही,” असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर बाळासाहेबांना संभाळा आता याला म्हणत त्या सापाची जबाबदारी माझ्यावर टाकल्याचं खैरे म्हणाले. तसेच आपण यावरुन निसर्गमित्र बाळासाहेब नावाचा एक लेखही लिहाला असल्याचं खैरे यांनी राज यांना सांगितलं.

प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या या नवीन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी राज ठाकरेंसोबतच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मनसे गटनेते साईनाथ बाबर, मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे नेतेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *