महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवारपासून (दि. 22) गुरुपौर्णिमा उत्सव सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीचा उत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.
कान्हूराज बगाटे म्हणाले, ‘गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे साईबाबांचे समाधिमंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासनआदेशान्वये 16 नोव्हेंबर 2020पासून साईबाबांचे समाधिमंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी-शर्तींवर खुले करण्यात आले होते. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदी ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 5 एप्रिल 2021 रोजीपासून श्री साईबाबा समाधिमंदिर दर्शनाकरिता साईभक्तांना बंद ठेण्यात आलेले आहे. त्यामुळे 22 ते 24 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.