महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनीही स्वतः उपस्थित राहत बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, त्यांचा सन्मानही केला आहे.
बाबासाहेब पुरंदरे आज १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच, ९९ दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी खास उपस्थिती लावली.
राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्प व पगडी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरेंच्या या कृतीमुळं कार्यक्रमाला उपस्थित असलेले सारेच भारावून गेले.
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस. आज ते १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आणि समस्त 'मनसे परिवारा'च्या वतीने चिरतरुण
शिवशाहिरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/H3gB2mwm4F— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 29, 2021
राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात पुण्यात असताना राज यांनी वेळात वेळ काढून बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली होती व त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे कुटुंबाचे फार जुने ऋणानुबंध आहेत. त्यातही शिवशाहीर पुरंदरे हे राज यांच्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यामुळे पुण्यात जाणे असेल तर राज हे आवर्जुन पर्वती भागात जाऊन बाबासाहेबांची भेट घेतात.