वरळी सीफेस प्रति स्क्वे.फूट @93000 ; सुरतच्या हिरे व्यापाऱ्याने खरेदी केला 185 कोटींचा बंगला,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । मुंबईतील जागेला सोन्याची किंमत होतीच. पण आता हिऱ्याची किंमत आली असे म्हणायला हरकत नाही. यामध्ये विशेषकरून मध्य मुंबईचा उल्लेख करावा लागेल. मध्य मुंबईतील वरळी भागातील जागांचे दर आता फक्त श्रीमंतांच्याच आवाक्यात राहिले आहेत. वरळी सी-फेसजवळील जागांची किंमत प्रति चौरस फूट 93 हजार रुपयांवर पोहोचली आहे. हिरे उद्योगातील प्रसिद्ध ‘हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड’ या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला नुकताच 185 कोटी रुपयांना विकत घेतला.

वरळी सी-फेसजवळ असणाऱ्या या बंगल्याचे नाव आहे ‘पन्हार बंगलो’. या बंगल्याला तळघर, तळमजला आणि वर सहा मजले आहेत. 30 जुलै रोजी या मालमत्तेचा व्यवहार झाला. 93 हजार रुपये चौरस फुटाने ही मालमत्ता विकली गेली. ती आतापर्यंत एस्सार समूहाच्या आर्पे होल्डिंग्ज लिमिटेडच्या मालकीची होती. या बंगल्याचे क्षेत्रफळ 1349 चौरस मीटर आहे.

पन्हार बंगलो खरेदी करणारी हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड ही कंपनी सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी घनश्यामभाई धनजीभाई ढोलकिया यांच्या मालकीची आहे. घनश्यामभाई ढोलकिया यांचे पुत्र सावजी ढोलकिया आता या कंपनीचा कारभार पाहतात. सावजी हे अत्यंत दानशूर मालक म्हणून ओळखले जातात. 2018 मध्ये त्यांनी आपल्या तीन सर्वेत्कृष्ट कर्मचाऱयांना मर्सिडीज कार बक्षीस दिल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी दिवाळी बोनस म्हणून कामगारांना 500 फ्लॅट्स आणि हिऱयांचे दागिने भेट दिले होते.

आर्पे होल्डिंग्जने या बंगल्यावर इंडिया बुल्स हाऊसिंगकडून 144.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे बंगल्याची रक्कम इंडिया बुल्सला देण्यात आल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

कागदपत्रे पाहिली तर ‘पन्हार बंगलो’ ही मालमत्ता आतापर्यंत अनेकांच्या ताब्यात राहिली आहे. 13 ऑक्टोबर 1941 रोजी पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेने हा बंगला असलेली जमीन वार्षिक 1 रुपया भाडेतत्त्वावर कुबालया राज यांना दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *