मास्टर शेफ संजीव कपूर यांची माणुसकी! पूरग्रस्तांना दररोज पुरवताहेत १५ हजार थाळ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने शेकडो संसार मोडून पडले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटीही त्यात खारीचा वाटा उचलत आहेत. मास्टरशेफ संजीव कंपूर यांनीही यात पुढाकार घेतला असून शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून ते चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवठा करत आहेत. त्यांची टीम पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवत आहे.

 

‘महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबीयांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,’ असं पद्मश्री पुरस्कार विजेते शेफ संजीव कपूर यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितलं.

कोविड १९ च्या संकट काळातही संजीव कपूर यांनी अशीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने करोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत त्यांच्या टीमने दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनऊ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *