चांगली बातमी ! महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्यातील भंडारा (Bhandara) हा जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा (Corona-free district) झाला आहे. शुक्रवारी शेवटच्या कोरोना रुग्णाला देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवारी झालेली कोरोना चाचणीत कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला नाही.

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितलं की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्याला कोरोनामुक्त करणं शक्य झालं आहे. याशिवाय त्यांनी ट्रेसिंग, चाचण्या आणि उपचाराबाबत आखलेल्या रणनीतीचाही उल्लेख केला आहे. खरंतर, गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गराडा बुद्रुक गावात कोविडचा पहिला रुग्ण आढळला होता.

यावर्षी 12 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधिक 1596 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात सक्रिय प्रकरणांची संख्या सर्वाधिक 12 हजार 847 इतकी होती. त्याचबरोबर जिल्ह्यात 12 जुलै 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *