पुण्यातील व्यापाऱ्यांचा आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा ; भूमिका कायम,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचं रांका यांनी स्पष्ट केलंय. (traders aggressive against corona restrictions in Pune)

पुण्यात दुकानांसाठी सकाळी 7 ते दुपारी 4 ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, व्यापारासाठी ही वेळ योग्य नाही. आम्हाला 7 ते 4 ऐवजी 11 ते 8 अशी वेळ देण्यात यावी. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असतानाही निर्णय घेतला जात नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार, अशी आक्रमक भूमिका फत्तेचंद रांका यांनी घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुपारी 4 पर्यंतची वेळ दिलेली असताना पुण्यातील व्यापारी संध्याकाळपर्यंत दुकानं सुरु ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महापौरांचा आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
दरम्यान, पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. पुणे शहरात शिथिलता देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेकडे प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रस्ताव वाठवला आहे. पुढील कोरोना आढावा बैठकीत पुण्यातील शिथिलतेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल पुण्यातील कोरोना निर्बंधांवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही कळत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.

व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका – मुख्यमंत्री
ज्या ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची त्या ठिकाणी ही शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ कोणी लाडका आहे आणि कोणी दुश्मन आहे असं नाही, असं सांगतानाच राज्यातील नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *