महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । राज्यात करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी भीती कायम आहे. त्यामुळे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. आज ९ हजार ३५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ३९ हजार ४९३ बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.७२ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात ६ हजार ६१ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ७१ हजार ५० रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या ४ लाख ३१ हजार ५३९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २ हजार ७६१ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९३ लाख ७२ हजार २१२ नमुन्यांपैकी ६३ लाख ४७ हजार ८२० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे १२.८६ टक्के इतकं आहे. शनिवारी १२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे.
केंद्र सरकारने Johnson and Johnson च्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. “भारतानं आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात करोनाविरोधात ५ लसीचा परवानगी आहे. यामुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल”, असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.