महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील पॅनबेरा येथील एका रुग्णालयात लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी घसरून पडल्याने ख्रिस केर्न्स जखमी झाला होता.
51 वर्षीय ख्रिस केर्न्सवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया झाल्या असून त्याची प्रकृती मागील काही काळापासून चिंतेचा विषय बनली आहे. ख्रिस केर्न्सला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र या शस्त्रक्रियांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. ख्रिस केर्न्सच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ख्रिस केर्न्सची प्रकृती अत्यवस्थ असली तरी त्याच्या प्रकृतीसंदर्भात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने अद्यापि कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.