लहान मुलांना चालू वर्षी कोरोना लस नको ; नॅशनल कोव्हिड टास्क फोर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । लहान मुलांना चालू वर्षी कोरोनावरील लस दिली जाऊ नये, अशी शिफारस नॅशनल कोव्हिड टास्क फोर्स ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केली आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाऊ शकतो, असे नॅशनल कोव्हिड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसर्‍या लाटेदरम्यान विषाणूचा लहान मुलांवर कितपत परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासादरम्यान दोन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षी लहान मुलांना लस देण्याचे टाळले जावे, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. संशोधन समूहाने आपल्या शिफारशी विस्तृत स्वरूपात
मंत्रालयाला पाठविल्या आहेत.

तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखली जात आहे. शिवाय विविध कंपन्यांकडून मुलांसाठीच्या लसीवर वेगाने काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने दिलेल्या या शिफारशी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

मुलांच्या आई-वडिलांना जितका कोरोनाचा धोका आहे, तितका मुलांना नाही. त्यामुळे मुलांचे लसीकरण लांबविले जाऊ शकते, असे सांगून डॉ. अरोरा म्हणाले की, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व टार्गेटेड लोकांना लस देणे गरजेचे आहे.

18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच्या लसीची परीक्षणे पार पडली आहेत. अशा स्थितीत डिसेंबरनंतरच्या पुढील तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्च 2022 पर्यंत मुलांना लस दिली जाऊ शकते, अशी शिफारस आम्ही केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *