पलायन करण्याच्या नादात उडत्या विमानातून पडले तीन जण; अमेरिकेच्या लष्करी विमानाच्या चाकात लपून प्रवासाचा प्रयत्न फसला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर लोक कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात तीन जणांचा हाच प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. तालिबानच्या भीतीने देश सोडण्याच्या नादात हे तिघे अमेरिकेच्या लष्करी विमानातील चाकामध्ये लपले होते. चाकाच्या जागेत लपून आपण देश सोडता येईल असे त्यांना वाटत होते. पण, त्यापैकीच तीन जण विमान हजारो फुट हवेत असताना घसरून पडले. काहींच्या मते, हे लोक विमानावर बसून आणि लटकून प्रवास करण्याच्या नादात होते.

उडत्या विमानातून लोक पडत असल्याचा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या राजधानीतून समोर आला आहे. यामध्ये एका पाठोपाठ एक तीन जण विमानातून पडताना दिसून येत आहेत. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याच्या नादात हे लोक अमेरिकेच्या लष्करी विमानावर चढले होते. तसेच विमानाच्या टायरच्या जागेत लपून बसले होते. पण, काबूल विमानतळावरून जेव्हा या विमानाने उड्डान घेतले आणि विमान आपल्या वेगात आले तेव्हा एकानंतर एक तिघेही खाली पडले.

विमानतळांवर बस स्टँडसारखी गर्दी
अफगाणिस्तानच्या विमानतळावर सध्या इतकी गर्दी पाहायला मिळते जणू ते विमानतळ नसून बस स्टँड आहे. आपल्या जीवासमोर सामानाची काय चिंता. आपले सर्वस्व सोडून हजारोंच्या संख्येने लोक विमानतळ गाठत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसावे असे चित्र आहे. राजधानीत लोकांना आपले मोबाईल रिचार्ज सुद्धा करता येत नाही. तर काही लोक आपले कॉल बॅलेन्स आणि इंटरनेट जीवन मरणाच्या परिस्थितीसाठी राखून ठेवत आहेत.

विमानतळावर गोळीबारात 5 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तान सोडण्यासाठी लोक काही करण्यास तयार आहेत. अशात सर्वाधिक गर्दी विमानतळांवर पाहायला मिळत आहे. हे विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षक अपयशी ठरत आहेत. याच दरम्यान गोळीबार झाला. यामध्ये 5 जणांचा जीव गेला. तसेच अनेक जण जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *