पुढील टप्प्यात लशीचा एक डोस घेतलेल्यांना लोकल मुभा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना मुंबईत रविवारपासून लोकलप्रवासाची मुभा मिळाली असतानाच, सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांनंतर आज, मंगळवारपासून सर्व कार्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात नेमकी किती गर्दी होते, याचे नेमके चित्र आज स्पष्ट होणार आहे. लसधारकांना लोकलमुभा दिल्यानंतरही गर्दी आटोक्यात राहिली, तर पुढील टप्प्यात लशीची एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांसाठीही लोकलची दारे उघडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे कळते.

लस प्रमाणपत्राची पडताळणी आणि लिंकच्या माध्यमातून ओळखपत्र घेतलेल्या प्रवाशांना लोकलचा पास देण्यात येत आहे. रविवार-सोमवार सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी लोकलला कमी प्रमाणात गर्दी दिसून आली. लशींचा पुरवठा कमी-अधिक होत असल्याने त्यानुसार लसीकरणाचा वेग कमी-अधिक होत आहे. दोन मात्राधारकांनाच लोकलमुभा दिल्याने एक मात्रा घेतलेला १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुण अद्याप प्रवासापासून दूर आहे. येत्या सात दिवसांत लोकल प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ दिसून आली नाही, तर एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांनादेखील लोकलमुभा देण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकलसेवा सर्वांसाठी खुली होण्याआधी, शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी प्रवासी संख्या १२ लाख ३९ हजार इतकी नोंदवण्यात आली. लसधारकांना लोकलमुभा मिळाल्यानंतर म्हणजेच, रविवारी प्रवासी संख्या आठ लाख ५० हजारापर्यंत खालावली. रविवार-सोमवार सुट्टी असल्याने किती अतिरिक्त प्रवाशांनी लोकलसेवेचा लाभ घेतला, हे नेमके स्पष्ट होत नाही. आज, मंगळवारी वाढीव प्रवासी संख्येचे नेमके चित्र स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रवासी संख्या कमी-अधिक प्रमाणात होती. मात्र नेमके किती प्रवासी वाढले, हे मंगळवारी स्पष्ट होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यामधून रोज सरासरी २० ते २२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *