महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । स्वयंपाकाला चव आणि गंध देणाऱ्या मसाल्याचे दर अवघ्या १५ दिवसांत दुपटीहून अधिक वाढल्याने आमटी, भाजीचा तडका तडकला आहे. याचबरोबर प्रतिकारशक्तीबरोबरच शक्ती वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुका मेव्याचे दरही भडकले आहेत.
तोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात अवघ्या १५ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. १ हजार ६०० रुपये किलोने असलेल्या खसखशीचा दर ३ हजार रुपये किलोवर गेला आहे. चटणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रामपत्री, तमालपत्री, जायपत्री याचे दर दुपटीने वाढले आहेत.
काजू, बदाम हे श्रीमंतांचे खाणे मानले जात असले, तरी करोनाच्या महामारीमुळे मध्यमवर्गीयांच्या घरातही हे पदार्थ आवर्जून वापरले जात आहेत. यातच श्रावण महिन्यात असलेल्या सण, उपवासाच्या निमित्ताने याचा वापर वाढला आहे. नेमक्या याच स्थितीत बाजारातील या खाद्य पदार्थांचे दर भडकले आहेत. आजचे दर आणि कंसात पंधरा दिवसांपूर्वीचे प्रति किलोचे दर असे आहेत, काजू- ८५० (६५०), पिस्ता १९०० (१६६०), बदाम ६२० (१०२०), अक्रोड १३०० (८५०), खारीक २४० (११०), प्रत्यक्ष ग्राहकांना या दरावर १२ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याचे विकेत्यांनी सांगितले.