महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 22 ऑगस्ट म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ऑनलाईन होणार होती. लॉग इन केल्यापासून पेपर सोडवण्यासाठी दोन तासांचा अवधी देण्यात आला होता. 5 सप्टेंबरलाही हेच वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता आहे.
प्रवेश परीक्षेतून सूट
नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी सवलत देण्यात आली होती. या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार रुपये शुल्क असेल तर राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क आकारण्यात आले. तर, जे उमेदवार थेट मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले होते.