‘कोंबडीचोर’ म्हणत शिवसैनिकांनी हवेत भिरकावल्या कोंबड्या ; नारायण राणेंविरोधात संतापाची लाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. या विधानामुळे मंगळवारी कल्याण -डोंबिवलीमध्येही ठिकठिकाणी सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी राणे यांना “कोंबडीचोर” असे म्हणत शिवसैनिकांनी हवेत कोंबड्या भिरकावल्या.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. तर डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर यावेळी शिवसेनेने आपला संताप व्यक्त केला. रायगडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद कल्याण डोंबिवलीमध्येही उमटलेले पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *