महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंडने त्यांचा संघ जाहीर केला आहे. या संघातून दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मार्क वुड खेळणार नाही. लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरी कसोटी २५ ऑगस्टपासून हेंडिग्ले मैदानात खेळली जाणार आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे मार्क वुड तिसरा कसोटी सामना खेळणार नाही. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना वुडच्या खांद्याला दुखापत झाली होती. दरम्यान, मैदानात उतरणार नसला तरी तो मेडिकल टीमच्या देखरेखीखाली लीड्समध्ये संघासोबत असेल. इंग्लंड संघात टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेव्हिड मलानचे पुनरागमन झालेआहे. मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यात त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज साकीब महमूदला संघात स्थान मिळाले आहे. साकीबला तिसऱ्या कसोटीच्या अंतिम संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याने अजून कसोटी पदार्पण केलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने ९ विकेट घेत इंग्लंडला ३-० अशी मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी संघ निवडताना जॅक क्रॉवली, डॉम सिब्ली, जॅक लीच यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आघडीचा फलंदाज सिब्लीला दोन सामन्यांत १४.२५ च्या सरासरीने फक्त ५७ धावा करता आल्या. लॉर्ड्सवर पहिल्या डावात त्याने ४४ चेंडूत ११ धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला खातेही खोलता आले नाही. क्रॉवलीला एका कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने १६.५० च्या सरासरीने ३३ धावा केल्या होत्या. फिरकीपटू जॅक लीचला अंतिम अकरा खेळाडूत स्थान मिळाले नव्हते.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : ज्यो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉन बेअरस्टो, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकीब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ऑली रॉबिन्सन.