महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । दिव्यांगांचे आयुष्य व्हीलचेअरवर जाते. त्यांना कुणाच्या मदतीशिवाय बाहेरचे जग बघता येत नाही. दिव्यांगांना नवे जीवन देण्यासाठी आयआयटी मद्रासने अनोखी व्हीलचेअर तयार केली आहे. स्वदेशी मोटार चलित व्हीलचेअरचे नाव निओबोल्ट आहे. ही व्हीलचेअर मोटारवर चालते. ती रस्त्यावर येताच मोटरसायकलसारखी बनते. ती सपाट तसेच खडबडीत रस्त्यावर चालू शकते.
आयआयटी मद्रासच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या प्रा. सुजाता श्रीनिवासन आणि निओमोशन स्टार्टअपच्या सहकार्याने निओबोल्ट व्हीलचेअरचा प्रकल्प तडीस नेला आहे. निओमोशनचे सीईओ स्वस्तिक दास हे आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. याविषयी प्रा. सुजाता श्रीनिवासन म्हणाल्या, आपण दिव्यांगजनांना व्हीलचेअरवर पाहतो. त्यावरच त्यांचे आयुष्य मर्यादित असते. त्यांना घराच्या चार भिंतींबाहेर सामान्य लोकांसारखे फिरता आले पाहिजे. त्यासाठी आम्ही अनोख्या व्हीलचेअरची निर्मिती केली आहे.
निओबोल्ट घराच्या आत व्हीलचेअर आणि बाहेर मोटरसायकल बनते. दिव्यांग तिचा वापर सहजतेने करू शकतात.यामध्ये लिथियम–आयन बॅटरीचा वापर करण्यात आला असून ती एकदा चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटरपर्यंत चालू शकते.