कर्दनकाळ जो रुट ; पुन्हा भारतीय गोलंदाजांची धुलाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । भारतासाठी या मालिकेतील खराखुरा कर्दनकाळ ठरत आलेल्या कर्णधार जो रुटसह (121) डेव्हिड मलान (70), हसीब हमीद (68), रोरी बर्न्स (61) यांनी धडाकेबाज फटकेबाजी केल्यानंतर इंग्लंडने येथील तिसऱया कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी भारतावर 345 धावांची भरभक्कम आघाडी प्राप्त केली. इंग्लंडने दिवसअखेर 129 षटकात 8 बाद 423 धावा फलकावर लावल्या.

रुटने या मालिकेत सलग तिसरे शतक झळकावताना भारतीय गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. त्याला मलान, हमीद, बर्न्स या फलंदाजांनी उमदी साथ दिली. भारताचे बहुतांशी गोलंदाज निष्प्रभ ठरले. मोहम्मद शमीने 26 षटकात 87 धावात 3 बळी घेतले तर सिराज व जडेजा यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले असले तरी यासाठी त्यांना अनुक्रमे 86 व 88 धावा मोजाव्या लागल्या.

इंग्लंडला पहिल्या सत्रात 62 धावा जमवता आल्या. त्यांनी बिनबाद 120 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर दमदार मजल मारली. इंग्लंडने पुढे दुसऱया सत्रात 26 षटकात 116 तर तिसऱया सत्रात 35 षटकात 125 धावा केल्या.

भारताचा पहिला डाव सर्वबाद 78 धावांवरच गुंडाळला गेल्यानंतर इंग्लंडने 8 बाद 423 धावांचा डोंगर रचल्याने या लढतीवर त्यांचे वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित झाले. अद्याप 3 दिवसांचा खेळ बाकी असताना इंग्लंडने डाव घोषित करण्याची घाई करण्याऐवजी आघाडी वाढवत जाण्यावर अधिक भर देणे पसंत केले.

शमीने राऊंड द विकेट मारा करताना रोरी बर्न्सला (153 चेंडूत 61) पहिल्या तासाभरातील खेळात बाद केले. बर्न्सने 153 चेंडूत 61 धावांचे योगदान दिले. शमीच्या एका किंचीत आत वळलेल्या चेंडूने बर्न्सचा ऑफस्टम्प उद्ध्वस्त केला. त्यानंतर फिरकीपटू रविंद्र जडेजाने दिवसभरातील आपल्या पहिल्याच षटकात हसीब हमीदचा त्रिफळा उडवत सांघिक दुसरे यश नोंदवले.मिडल व ऑफस्टम्पच्या रोखाने टाकलेल्या चेंडूने बेल्स उडाली आणि भारताला हवेहवेसे यश प्राप्त झाले.त्यानंतर मात्र डेव्हिड मलान व कर्णधार जो रुट यांनी आत्मविश्वासपूर्ण फटकेबाजी करत भारतावरील दडपण आणखी वाढवले. 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिलीच कसोटी खेळत असलेल्या डेव्हिड मलानने 70 धावांची खेळी साकारत आपला फॉर्म दाखवून दिला

इंग्लिश आघाडीवीरांनी भारतीय गोलंदाजांची सहजपणे धुलाई करण्याचा सिलसिला अव्याहतपणे सुरु ठेवला होता. जी अचूकता इंग्लिश गोलंदाजांनी दाखवली, ती भारतीय गोलंदाजांना शक्य झाली नसल्याचे पहिल्या दोन्ही सत्रात प्रकर्षाने दिसून आले. शतकवीर रुटला बुमराहने त्रिफळाचीत केले. मात्र, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.

दिवसअखेर क्रेग ओव्हर्टन 31 चेंडूत 24 तर ऑलि रॉबिन्सन 6 चेंडूत शून्यावर खेळत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *