सुप्रीम कोर्टात नवे 9 जज, ३ महिलांचा समावेश ; नागरत्ना सरन्यायाधीशपदाच्या दावेदार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टात ९ नव्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यात ३ महिलांचा समावेश आहे. यामुळे आता सुप्रीम कोर्टात स्वीकृत ३४ पदांपैकी एकच रिक्त आहे.

नव्या न्यायमूर्तींमध्ये समावेश असलेल्या न्या. बी. व्ही. नागरत्ना सप्टेंबर २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतात. सध्या त्या कर्नाटक हायकोर्टात कार्यरत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त तेलंगणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात हायकोर्टाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांचा नव्या नियुक्तीमध्ये समावेश आहे. न्या. कोहली १ सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्याने त्यांचा कार्यकाळ ३ वर्षे वाढेल. कारण, या पदावर निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. हायकोर्टात ते ६२ वर्षे आहे.

कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका, गुजरात हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ, सिक्कीम हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जितेंद्रकुमार माहेश्वरी, केरळ हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार आणि मद्रास हायकोर्टाचे न्या. एम. एम. सुंदरेश यांचा नव्या नियुक्त्यांत समावेश असून ज्येष्ठ वकील व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंह यांची सर्वोच्च न्यायालयात थेट नियुक्ती करण्यात आली आहे. अशी नियुक्ती झालेले ते सहावे वकील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *