सिंधुदुर्गात वैभव नाईक, नितेश-निलेश राणेंसह भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ ऑगस्ट – नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कालपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान कणकवली येथील सभेत राणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याने भाजपा- शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

करोना निर्बंधांच्या काळात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, भाजपाचे आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणे यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यातच शहरातील नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातही शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी याबाबत पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर, रिमेश चव्हाण, शैलेश भोगले, भूषण परुळेकर, सचिन सावंत, महेश कांदळकर, भाई कासवकर, यकिन खोत, राजू राठोड तसंच इतर १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर भाजपाचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, सुरेंद्र कोदे, शिशीर परुळेकर व आदी ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *