![]()
महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ ऑगस्ट – राज्यातील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पांडुरंगा चागंला पाऊस पडू दे, सगळी धरणं भरु दे, असं साकडं घातलं आहे. यंदाच्या मान्सूनच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीन राज्यात 4 ते 5 दिवसात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं या पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अधिक माहितीसाठी IMD वेबसाईट पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी सिंधुदुर्ग , बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे. तर 29 ऑगस्टला देखील रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना अॅलर्ट देण्यात आला आहे.
30 ऑगस्टला विविध जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट
हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अॅलर्ट
मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.