रुट आणि रॉबिन्सन चा टीम इंडियाला तडाका , भारताचा डावाने पराभव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. (England team beat India in third test by innings and 76 runs at Headingly level 5 match test series)

भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली होती. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत होते. त्यामुळे भारत सुस्थितीत होता. मात्र आजचा दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांचा होता. इगंल्ंडच्या गोलंदाजांनी अवघ्या एका सत्रात टीम इंडियाचे 8 फलंदाज बाद केले. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच पुजारा 91 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली अर्धशतक करुन बाद. झाला. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. अखेरच्या षटकात रवींद्र जाडेजाने थोडी फटकेबाजी करुन मनोरंजन केलं, मात्र तो भारताचा डावाने होणारा पराभव रोखू शकला नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा, पुजारा आणि कोहली या तिघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या तिघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. अखेर भारताचा डाव 278 धावांमध्ये संपुष्टात आला. टीम इंडियाला पहिल्या डावात 78 तर दुसऱ्या डावात 278 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्यात भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *