कोरोना : नाकावाटे घ्यावयाची दोन औषधे लवकरच येणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । कोरोनावर इंजेक्शन आणि गोळ्या स्वरूपातील औषधांची यशस्वी निर्मिती केल्यानंतर भारतीय औषध कंपन्यांनी आता नाकावाटे श्वसनमार्गात स्प्रे स्वरूपातील औषधे बनविण्याकडे मोर्चा वळवला आहे. यामध्ये ल्युपिन फार्मास्युटिकल्स या कंपनीला रेमडेसिवीरच्या पावडर स्वरूपातील औषधाच्या दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना अनुमती मिळाली असून, ग्लेनमार्क फार्मा कंपनीच्या नाकावाटे घ्यावयाच्या नायट्रिक ऑक्साइड स्प्रेच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना प्रारंभ होत आहे. ही औषधे तुलनेने स्वस्त आणि कोरोनापासून अधिक संरक्षण देणारी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी नागरिकांसाठी हा दिलासा समजला जात आहे.

ल्युपिन फार्मा रेमडेसिवीरची पावडर घेऊन येण्याच्या तयारीत अनेक कंपन्यांनी कोरोनावरील औषधे बाजारात आणली आणि कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेतून नागरिकांना दिलासा मिळाला. आता औषध कंपन्यांनी त्याहीपुढे एक पाऊल टाकले आहे. ल्युपिन फार्मा रेमडेसिवीरची पावडर बाजारात घेऊन येण्याच्या तयारीत आहे, तर ग्लेनमार्कचा नेझल स्प्रे तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी सज्ज आहे.

सप्टेंबरअखेरीस या दोन्ही औषधांच्या चाचण्यांचे सोपस्कार पूर्ण होणे अपेक्षित आहे. वेळापत्रकानुसार झाले तर ऑक्टोबरच्या पूर्वार्धात आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन आयुधे हातात असतील. रेमडेसिवीर या औषधाचे पावडर स्वरूप ल्युुपिन आणते आहे. त्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यासाठी औषधे महानियंत्रकांकडे अनुमती मागितली होती. त्याला विषयतज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला आहे.हे औषध नाकावाटे थेट फुप्फुसात जात असल्याने त्याचा परिणाम लवकर होतो आणि ते तुलनेने स्वस्तही असेल, अशी चर्चा औषध कंपन्यांच्या वर्तुळात आहे. ग्लेनमार्क फार्माने कॅनडाच्या सॅनोटाईज या कंपनीबरोबर परस्पर सहकार्यातून नायट्रिक ऑक्साइड नेझल (नाकावाटे) स्प्रेच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचण्यांची तयारी सुरू केली आहे. ग्लेनमार्क हे औषध भारत आणि आशियाई देशात वितरीत करणार आहे. नॅनो मॉल्युक्यूल स्वरूपात असलेल्या या औषधामुळे 24 तासांत कोरोनाचे 95 टक्के, तर 72 तासांत 99 टक्के विषाणू (व्हायरल लोड) कमी होत असल्याचे आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण आहे.

मार्च 2021 मध्ये या औषधाच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेतल्या होत्या. त्यामध्ये त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता स्पष्ट झाली.साहजिकच ही दोन नवीन तुलनेने स्वस्त आणि वापरण्यास सोपी औषधे आगामी काळात नागरिकांना कोरोनापासून संरक्षण देण्यास उपयुक्त ठरतील, अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *