महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे. पुण्याचा पारा सरासरी 22 अंशापर्यंत खाली आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 17.3 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. (It has been raining continuously in Pune since this morning)
पुण्यात दिवसा 48 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पुण्यात अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे.
मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.