ठाण्यात मनसेनं फोडली निर्बंधांची हंडी;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पहिली दहीहंडी फुटली आहे. (MNS Dahi Handi 2021)करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने राज्य सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालत हा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र, मनसेनं ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राज्य सरकार विरुद्ध मनसे असा संघर्ष गेले काही दिवस पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनानुसार मनविसे विभाग सचिव मयूर तळेकर व उपशहरअध्यक्ष संदीप चव्हाण यांनी लक्ष्मी पार्क वर्तकनगर येथे दहीहंडी उभारली होती. गोविंदांनी हे निर्बंध झुगारत ही हंडी फोडुन मनसेचा झेंडा फडकवला. तर, ठाण्यातील नौपाडा येथे मनसेचं मुख्य कार्यालय आहे येथे देखील मनसैनिकांनी थर रचत दहीहंडी फोडली आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सव साजरा न करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावूनही ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवाची तयारी सुरू करत नौपाड्यातील भगवती शाळेच्या येथील मैदानात स्टेजही उभारला होता. मात्र, सोमवारी सकाळी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत स्टेज काढण्यास सांगितले. यावरून पोलिस आणि मनसे पदाधिकारी एकमेकांच्या समोरासमोर आले होते. तसेच, पदाधिकाऱ्यांनी स्टेजवरच आंदोलन करत उपोषण सुरू केले. परंतु पोलिसांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, स्टेज असो किंवा नसो आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असे जाधव यांनी सांगितले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *