महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । गणेशोत्सव तोंडावर आला असताना पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या बाजारात मागणी व पुरवठ्याचे असंतुलन निर्माण झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या किंमती उसळी घेण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मोहरीच्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मुंबई हे देशातील सर्वाधिक खाद्यतेलाची मागणी असलेल्या शहरांपैकी एक आहे. देशाच्या एकूण मागणीच्या जवळपास १५ टक्के मागणी मुंबईत असते. भारताला दरवर्षी लागणाऱ्या एकूण खाद्यतेला पैकी ५५ ते ६० टक्के तेलाची आयात होते. त्यातील ४० टक्के आयात मुंबईतील बंदरांवर होते. तरीही आता मुंबईतच खाद्यतेलाची काही प्रमाणात तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किंमती पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.
याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘प्रामुख्याने मोहरीच्या तेलाची तूट निर्माण झाली आहे. या तेलाची सर्वाधिक मागणी उत्तर भारतात असली, तरी मागील काही वर्षात मुंबईतदेखील मागणी वाढली आहे. आता या तेलाची तूट निर्माण झाल्याने त्याचे ग्राहक शेंगदाणा व सोयाबीन तेलाकडे वळतात. त्यामुळेच आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे.’
खाद्यतेलाच्या किंमती दोन महिन्यांपूर्वी सरासरी १६० ते १८० रुपये प्रति लिटरवर होत्या. केंद्र सरकारने आयात शुल्क घटवल्याने त्या १३० ते १५० रुपयांदरम्यान आल्या. पण आता मोहरीच्या तेलाची तूट निर्माण होत असल्याने शेंगदाणा व सोयाबीन तेलाची मागणी वाढेल. त्याचा परिणाम अन्य खाद्यतेलांवर होऊन त्यांच्याची किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने गणेशोत्सवापासून मागणी वाढती राहिल, तर दिवाळीदरम्यान दर पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.