करोनाची लाट जनतेला घाबरवण्यासाठी आणली जात आहे ; राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही मनसेकडून मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी हंड्या फोडण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. बाळा नांदगावर यांनी काळाचौकी दहीहंडी फोडल्यानंतर कार्यकर्त्यांसह त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद सादत याप्रकरणी भाष्य केलं आहे.

“गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

“केंद्र सरकारने राज्य सरकारला सणांमध्ये निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांच काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल होत आहेत यासंदर्भात विचारल्यावर, अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे अस्वल किती मोजत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंगावर केसेस आहेत. हे सर्व सुडबुद्धीने सुरु आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *