महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । गतवर्षी ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश तर, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण भरली होती. परंतु यंदाच्या ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सर्व धरणांतील पाणीसाठ्यात तुलनेत घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आज मंगळवारअखेर २७.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो सुमारे ९४ टक्के इतका आहे.
भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, वरसगाव आणि नीरा देवधर या चार धरणांमध्येच सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे. यंदा पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण भरली होती. परंतु ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे वरसगाव वगळता इतर तीन धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा ९८ टक्के आणि खडकवासला धरणातील पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला आहे. सध्या खडकवासला धरणातून उजवा मुठा कालव्याद्वारे एक हजार १५५ क्युसेकने आवर्तन सुरू आहे.