महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज, रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये; तर मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर येथेही पुढील आठवड्यात ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. याची सुरुवात शनिवारी संध्याकाळपासून झाली. दिवसभर रिपरिपणाऱ्या पावसाचा वेग शनिवारी संध्याकाळी वाढला. शनिवारी ठाणे, डोंबिवली येथे काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. मुंबईत एखाद-दुसऱ्या ठिकाणी पावसाचा जोर होता. शनिवारी मुंबईमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे ७.२ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे ८.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याचेही निरीक्षण नागरिकांनी नोंदवले. शनिवारी सर्वदूर पावसाचा जोर नसला तरी गणपतीच्या आधी हा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कोकणातही फारसा पाऊस नव्हता. मात्र आज, रविवारपासून दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकेल; तर मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढेल.