शिक्षकदिनी प्राध्यापकांकडून शासनाचा निषेध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । राज्यात साहाय्यक प्राध्यापकांच्या अठरा हजारांवर जागा रिक्त असतानाही सरकार प्राध्यापक पदभरतीसंदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने शासनाचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने राज्यभर शिक्षकदिनी तोंडाला काळे फासून आंदोलन केले. विशेष म्हणजे, शंभर टक्के प्राध्यापक भरतीसाठी ४९ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू असतानाही शासनाने याची दखल न घेतल्याने आता प्राध्यापकांनी कठोर भूमिका घेतली आहे.

पुणे आणि नागपूर येथे १९ जुलैपासून नेट, सेट, पीएच.डी. उत्तीर्ण नवप्राध्यापकांचे शंभर टक्के प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तीन वेळा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्राध्यापक भरतीचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. मात्र, तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.

अद्यापही वित्त विभागाने प्राध्यापक भरतीला मान्यता न दिल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्राध्यापक भरतीचा निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले जाते. महाराष्ट्रात आज अठरा हजारांवर प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.

‘डिग्री जलाव’ आंदोलन..उच्चशिक्षित पात्रताधारक बेरोजगार युवक-युवतींनी शिक्षक दिन भक्षक दिन म्हणून साजरा करीत डिग्री जलाव आंदोलन केले. नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक यात सहभागी झालेत. अभियांत्रिकीसह अन्य महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त असतानाही सरकार याबद्दल गंभीर नसल्याचा आरोप करीत उच्चशिक्षित नेट, सेट, पीएच.डी.धारकांनी डिग्री जाळून आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *