Ind vs Eng : अश्विनला का खेळवलं नाही?, विराटने एका वाक्यात द्यायचा तो मेसेज दिला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड न झाल्याने खूप चर्चा झडल्या. क्रिकेटमधील दिग्गज, माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनीही अश्विनला न खेळविण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंच पण त्यापेक्षा अधिक नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रीडारसिकांची नाराजी समजू शकतो पण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंचा देखील यामध्ये समावेश होता. खेळपट्टी सामन्याच्या चौथ्या डावात फिरकीपटूंना मदत करेल, असं म्हटलं जात होतं. अशा परिस्थितीत अश्विनच्या अनुपस्थितीमुळे तोटा सहन करावा लागू शकतो, अशी चर्चा होती.

पण भारताने अश्विनशिवाय चौथी कसोटी जिंकली तेही मोठ्या धुमधडाक्यात आणि सहजतेने. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीला अश्विनला न खेळविण्याच्या निर्णयावर विचारणा झाली. समालोचकाच्या प्रश्नाचं विराटने काहीसं तिखट उत्तर दिलं, संघ एकजुटीने निर्णय घेतो. बाहेर काय चर्चा होते याची आम्हाला पर्वा नाही, असं म्हणत विराटने एका वाक्यात द्यायचा तो मेसेज दिला.

सामन्यानंतर जेव्हा विराट कोहलीला रविचंद्रन अश्विनच्या पोझिशनवर विचारलं गेलं तेव्हा विराटने शांतपणे उत्तर दिलं. आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता हे सांगताना त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाले, “आम्ही कधीही विश्लेषण, आकडेवारी किंवा आकड्यांकडे बघत नाही. कुठं लक्ष केंद्रित करायचं हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही एक संघ म्हणून सामूहिक निर्णय घेतो. बाहेरच्या चर्चांवर आम्ही निर्णय घेत नाही”.

बहुतेक वेळा अमुक एका खेळाडूला संघात घ्यायला हवं, तमूक एकाला बाहेर बसवावं, अशा चर्चा सऱ्हासपणे झडतात. पण विराट कोहलीने दिलेल्या उत्तरात चर्चा केवळ चर्चा असतात अशा चर्चांवर संघाचा निर्णय ठरत नाही, हेच त्याने ठणकावून सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *