महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसांऐवजी 28 दिवसांनीच द्या, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. जर परदेशात जाणाऱया लोकांना 84 दिवसांच्या आत दुसरा डोस दिला जात आहे, मग रोजगार आणि शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱयांना दुसरा डोस वेळीच का दिला जात नाही, असा सवाल केंद्राला करीत न्यायालयाने हे निर्देश दिले.
केरळातील कायटेक्स गारमेंट्स कंपनीने आपल्या 5 हजारांहून अधिक कामगारांना दुसरा डोस देण्यासाठी 93 लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी केली आहे. मात्र केंद्राच्या सध्याच्या नियमांमुळे कंपनी कामगारांना दुसरा डोस देऊ शकलेली नाही. त्यामुळे कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. कंपनीच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करताना न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत निर्देश दिले.