महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू के ले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
गेल्या आठवडय़ापासून राज्यातील बहुतांश शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली आहे. काही कठोर पावले उचलली नाही तर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढेल व संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातूनच काही निर्बंध लागू के ले जातील. गौरी-गणपती विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जनानंतर जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार पाच किं वा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री बाहेर पडण्यावर निर्बंध लागू के ले जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये दर्शन बंद के ले जाईल. परिणामी मंडपांमध्ये गर्दी होणार नाही. महानगरपालिकांना या संदर्भातील आदेश काढण्यास सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाबाबत लवकरच मुख्यमंत्री नियमावली जाहीर करणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे संके तही त्यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या काळात कठोर निर्बंध लागू के ल्यास गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यावरून भाजप व मनसेकडून वातावरण तापविले जाऊ शकते. हा विषय संवेदनशील असल्याने घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगण्यात आले. दीड दिवसांचे गणपती की गौरी-गणपती विसर्जन झाल्यावर निर्बंध कठोर करायचे याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत शक्यतो निर्बंध लागू करू नये, असाच साऱ्यांचा सूर आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतरच लोक सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. त्यावेळी निर्बंध कठोर करण्याचा विचार सुरू आहे.