अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन ; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ सप्टेंबर । कोरोना महामारीच्या संकटात मंदिर परिसरातील अनेक व्यवसायिक, मंदिरातील कर्मचारी, लहान-सहान मंदिरातील पुजारी वर्गही आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे, या मंदिरातील पुजाऱ्यांना सरकारने मानधन देण्याची मागणी करण्यात येत होती. पंढरपुरातील वारकऱ्यांनीही अशी मागणी केली होती. त्यानुसार, कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला महिन्याला 5 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेने काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असे संतपीठ उभे रहावे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या मागण्या बैठकीत मांडल्या होत्या.

पंढरपूरमधील वारकरी संप्रदायाने यंदाही आपल्यातील संयम दाखवून दिला. कोरोना संकटामुळे यंदाही वारी हुकली, सुरुवातीला आक्रमक झालेल्या वारकऱ्यांनी पुन्हा सरकारच्या शब्दाला मान दिला. त्यामुळे, यंदाही वारीचा, आषाढाची उत्सव अतिशय साधेपणाने वारकऱ्यांविना आनंदात पार पडला. दरम्यान, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी अडचणीत सापडलेल्या वारकऱ्यांना महिन्याला 5 हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने या वारकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *