महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर ।Ganesh Chaturthi 2021: मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणपतींचं मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली गेली आहे. तर पुण्यातली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. (Ganesh Chaturthi : Ganpati Festival in Maharashtra)
मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. यंदा कोरोनामुळे साधेपणानेच उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे नियम पाळून मुंबईच्या राजाची पूजा पार पडली.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. रांजणगावच्या महागणपती मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगी विद्युत रोषणाईनं परिसर उजळून गेलाय. यंदा कोरोना मुळे महागणपती चा भाद्रपद यात्रा उत्सव मर्यादित स्वरुपात होणार आहे.