IND vs ENG : भारत-इंग्लंड पाचवी टेस्ट कधी होणार? BCCI ने केलं स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातली पाचवी टेस्ट मॅच रद्द करण्यात आली आहे. ही मॅच रद्द झाल्यानंतर कॅन्सल आणि फॉरफिट या शब्दांवरून गोंधळ निर्माण झाला होता. टेस्ट मॅच कॅन्सल झाल्याची घोषणा केली असती तर भारताने सीरिज 2-1 ने जिंकली असं घोषित केलं असतं, तर दुसरीकडे भारताकडून सामना फॉरफिट करण्यात आल्याची घोषणा झाली असती, तर ही सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली असती. या गोंधळानंतर आता बीसीसीआयने (BCCI) भूमिका स्पष्ट केली आहे.

बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात बरीच चर्चा करण्यात आली, यानंतर ही टेस्ट मॅच रद्द करण्यात आली आहे, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. याबाबतचं एक प्रसिद्धीपत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. तसंच बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड सामंजस्याने रद्द झालेली ही टेस्ट मॅच भविष्यात वेळ असेल तेव्हा खेळवतील. यासाठी तारीख शोधली जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

टीम इंडियाचे फिजियो योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर गुरुवारचा सरावही रद्द करण्यात आला. तसंच खेळाडूंना हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं. त्याआधी चौथ्या टेस्टदरम्यान हेड कोच रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे हे तिघं लंडनमध्येच क्वारंटाईन झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *