राज्यात येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा आल्यानं बळीराज्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप घेतली होती. मात्र आता पावसानं रौद्र रुप धारण केलं आहे. राज्यातील काही भागांमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. अति पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूरही आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML). येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.

पुढचे 3 ते 4 दिवस पश्चिम किनारपट्टीवर तुफान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई-ठाण्यासह उपनगर, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसधार – मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असं सांगण्यात आलं आहे.

गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पाऊस पडत आहे, या पावसामुळे रिकामे असलेले धरण काही प्रमाणात भरले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता आता मिटलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असून बळीराजा सुखावला आहे. मधल्या टप्यात पाऊस गायब झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *