कोयना धरणातून 25 हजार क्युसेकने विसर्ग सुरु; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ सप्टेंबर । कोयना पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि शिवसागर जलाशयातील संपुष्टात आलेली पाणी साठवणक्षमता लक्षात घेता, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे रविवारी सायंकाळी 5 वाजता 2.6 फुटांनी उचलून 22 हजार 730 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून एक हजार 50 असे एकूण 23 हजार 780 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली असून, नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात 29 हजार 332 क्युसेक प्रतिसेकंद सरासरी पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 98.77 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जुलै महिन्यात कोयना परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि ढगफुटी झाली. एका दिवसात जवळपास 700 ते 750 मिलिमीटर पावसाची नोंद कोयना परिसरात होऊन रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता. चार महिन्यांत कोयना धरणात सुमारे 130 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. दरम्यान, कोयना पाणलोटक्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. त्यातच 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणात सध्याच्या घडीला 103.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात 29 हजार 332 क्युसेक प्रतिसेकंद सरासरी पाण्याची आवक धरणात सुरू आहे. तर, धरणाचे सहा वक्र दरवाजे एका फुटाने उचलून सांडवा व पायथा वीजगृहातून एकूण 10 हजार 264 क्युसेक प्रतिसेकंद सरासरी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, सद्यःस्थितीत धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे दरवाजे दोन फूट सहा इंचांनी उचलून सांडवा आणि पायथा वीजगृहाद्वारे असे एकूण 25 हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *