‘महिला राज’, ; Ola इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीत स्त्रियाच चालवणार कारखाना, 10,000 जणींची भरती होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे महिला सर्व काम सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद. जर नसेल पाहिला तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण ओला (OLa) आपला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे. ओलाचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 10,000 हून अधिक महिलांना रोजगार दिला जाईल. (Ola electric scooter facility to be largest all-women factory in the world with 10000 Woman employee)

अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की ओला फ्यूचरफॅक्टरीचे संपूर्ण संचालन महिला करतील. ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला काम करतील. केवळ महिला कामगार असणारा हा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.” अग्रवाल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांची पहिली तुकडी दाखवण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची Ola कंपनीची योजना आहे. हे चार्जिंग नेटवर्क ओला हायपरचार्जर नेटवर्क (Ola Hypercharger Network) म्हणून ओळखले जाईल आणि जगातील सर्वात रुंद आणि सर्वात दाट इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क असेल. ओला भारताच्या 400 शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवण्याची योजना आखत आहे. ओलाने चारचाकी इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा केला नसला तरी, ते आपल्या वाहनांना चालना देण्यासाठी त्याच चार्जिंग नेटवर्कचा वापर करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *