महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र इथे तब्बल 3000 टन एवढं सोनं सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि हे सोनं इथे कसं, ते कुणाचं की पहिल्यांदाच खाणीत सापडलेलं, याविषयी चर्चा सुरू झाल्या. या कथित सोन्याच्या भांडारामुळे चर्चेत आला उत्तर प्रदेशातला सोनभद्र जिल्हा. सोनभद्रा जिल्हातील सोन्यावरून अनेक कथा समोर आल्या आहेत. चोपन विकास खंडामधील अगोरी गावातील आदिवासी राजा बल शाहचा किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. या राजानं हा सोन्याचा खजिना लपवल्याचा दावा इथल्या लोकांनी केला आहे. या सोन्याच्या भांडारावरून विविध ऐतिहासिक कथांचा संदर्भ दिला जात आहे. अनेकांनी या सोन्याशी संबंधित अनेक कथा सांगितल्या आहेत.
इसवी सन ७११ मध्ये आदिवासी राजा बल शाह यांचं राज्य होत. चंदेलमधील काही लोकांनी हा प्रदेश बळकावण्यासाठी हल्ला केला होता. या युद्धामध्ये राजा बल शाहचा पराजय झाला. या पराजयानंतर राजा बल शाह 4000 टन सोनं घेऊन गुप्त रस्त्यानं रेणू नदी पार करून जंगलात लपला. याठिकाणी असलेल्या पहाडीमध्ये राजानं हे सोन लपवल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोनभद्रामध्ये सोन्याच्या भंडाराचा सर्वे सुरू
राजा बल शाहनं याठिकाणी सोनं लपवल्याच्या दाव्यानंतर या डोंगराला सोन्याची पहाडी म्हटलं जात आहे. याठिकाणी पुरातत्व संशोधन खातं याचा अभ्यास करत आहेत. भारतातील सोन्याच्या पाचपट सोनं सोनभद्रामध्ये असल्याचे दावे केले जात आहेत. राजा बल शाहने हा सोन्याचा खजिना लपवल्याची माहिती मिळताच त्यावर अनेकांनी हक्क सांगितला आहे. परंतु या ठिकाणी असलेल्या गुहेत राजा बल शाह यांची पत्नी राणी जुरही हिला चंदेल शासकांनी मारलं होतं. या जुगैल जंगलात राणी जुरहीचं जुरही देवी मंदिर देखील आहे. त्यामुळे हा सोन्याचा साठा राजा बल शाह यानंच ठेवल्याचा दावा इथल्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यानं केला आहे.
नेमकं कुठे आढळलं सोनं?
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील हरदी भागामध्ये ४ हजार टन सोन्याचा साठा असल्याचा दावा करण्यात आला होता. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या ब्लॉकचे लिलाव केले जाणार असल्याचंही बोललं जात आहे. यासाठी सरकारने सात सदस्यांची समितीही स्थापन केल्याच्याही जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र असं कोणतंही सोनं आढळला नसल्याचा दावा पीटीआयला दिलेल्या माहितीत सोनभद्र जिल्हा भूगर्भ शास्त्रज्ञांनी केला आहे.