उत्पादन घटल्यामुळे भाकरी महागली; बाजरी, ज्वारी, तांदळाच्या दरात कमालीची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी मुंबई :
यंदा उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वाशीतील घाऊक बाजारात ज्वारीचा दर 21 ते 39 रुपये किलो होता. तो सध्या 29 ते 45 रुपये किलो झाला आहे. गतवर्षी बाजरीला 18 ते 25 रुपये किलो दर मिळत होता. सध्या बाजरीला 30 ते 35 रुपये दर मिळत आहे; तर मागील वर्षी तांदळाला 30 ते 42 रुपये किलो दर मिळत होता, तो सध्या 30 ते 48 रुपये किलोवर पोहोचला आहे. अर्थात, मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे आठ, 10 आणि सहा रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून गरिबांची भाकरी महागली आहे.

धान्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ज्वारी, बाजरी, तांदळाचे दर वाढल्याने गरिबांच्या भाकरीच्या किमतीतही चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. या वर्षी राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा फटका ज्वारी-बाजरीसारख्या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. पाण्याअभावी ही पिके घेणे आता शक्‍य होत नाही. दोन वर्षांपूर्वी नेमाने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक राहावे या उद्देशाने लागवड केली जात आहे. बाजरीच्या तुलनेत ज्वारीला पाणी अधिक लागते. प्रामुख्याने सोलापूरमध्ये तर काही प्रमाणात लातूर, विदर्भामध्ये ज्वारी-बाजरी घेतली जाते. विदर्भामध्ये ज्वारीचे पीक घेतले जात होते; मात्र तिथे रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळले असून, केवळ जनावरांना चारा उपलब्ध होईल, घरची धान्याची गरज पूर्ण होईल, इतकीच ज्वारी शेतकरी पिकवत आहे. नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने बाजारात धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *