मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ,; या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । Rain in Marathwada, Vidarbha : ‘गुलाब’ या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. तर मांजरा नदी पुरात 17 जण अडकले आहेत. अंजना, हिवरा नदीला पूर आला आहे. दरम्यान, विदर्भातही चांगला पाऊस झालाय. यवतमाळच्या उमरखेडमधल्या दहेगाव पुलावरून एसटी बस वाहून गेली. पुलावर पाणी असतानाही चालकाचा आततायीपणा नडला आहे. दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीचा धोका कायम असून ‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शिमरी पारगाव गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर आंबेजोगाई तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. केज, आंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात रात्रभर पाऊस कोसळत आहे. मांजरा नदी काठची 10 घरं वाहून गेली आहेत. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत बीड जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या कुंडलिका सिंदफणा बिंदुसरा मांजरा या मुख्य नद्यांना पूर आलेला आहे. या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

माजलगाव आणि वडवणी या दोन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातील शिमरी पारगाव या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला नदीपात्रातील पाणी घुसल्यामुळे नदीचा स्वरूप आले आहे. अंबेजोगाई केज तालुक्यातही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी घुसल्याने अनेक नागरिकांनी रात्र जागून काढावी लागली. तर देवळा गावातील मांजरा नदीच्या काठची दहा घरं वाहून गेल्याने अनेकांचे संसास उघड्यावर आले आहेत.

औरंगाबाद जिल्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिशोर गावातील अंजना नदीला पूर आला. शेतकऱ्यांनी नदी पार करण्यासाठी दोर बांधला होता. त्या दोरखंडास पकडून शेतकऱ्यांना यावे लागत आहे. आज सकाळी दोरखंड पकडलेले असताना ही एक जण वाहून जात असताना थोडक्यात बचावला. धोकादायक प्रकार थांबण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येते आहे.

औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यतील हिवरा नदीला रात्री झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं बनोटी गावात सुद्धा पाणी शिरलं आहे. रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे, नदी दुथडी भरून वाहू लागली. पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *