महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । राज्यात अनेक भागांत दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा धोका राज्य किंवा देशाच्या किनारपट्टीला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मात्र मराठवाडय़ात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात येत्या गुरुवारी (ता. ३०) आणि शुक्रवारी (ता. १) या दोन दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी २५ ते ५० टक्के शक्यता आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील दोन दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : पालघर
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
विदर्भ : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
इतर महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक.