कानातील मळ काढण्यासाठी Ear buds वापरता का ? मग एकदा हे वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । कान (Ear) हा मानवी शरीरातल्या नाजूक अवयवांपैकी एक आहे. कानाला झालेली लहानशी दुखापतसुद्धा (Ear problem) व्यक्तीला हैराण करून सोडते. त्यामुळे कानांची व्यवस्थित निगा राखणं अतिशय गरजेचं आहे (Cleaning ear). बहुतांश लोक कान साफ (Earwax) करण्यासाठी इयरबड्स (Earbuds) वापरतात. कानातली घाण साफ व्हावी हा इयरबड्सच्या वापरामागचा उद्देश असतो. त्यासाठी अनेक जण कानात जास्तीत जास्त आतपर्यंत इयरबड घालण्याचा प्रयत्न करतात; पण यामुळे तुमच्या कानांना हानी पोहोचू शकते.

पूर्वी कान साफ करण्यासाठी लोक काडेपेटीतल्या काडीचा वापर करायचे. ती काडी कानासाठी धोकादायक आहे ही बाब लक्षात आल्यानं अनेकांनी त्याचा वापर सोडला. आता खूप कमी जण काडेपेटीतल्या काडीचा वापर यासाठी करतात. त्याच्या जागी आता अनेकांनी इयरबड्सचा वापर सुरू केला आहे. प्लास्टिकच्या लहानशा नळीच्या टोकांना कापूस लावलेल्या या बड्सचा आता कान साफ करण्यासाठी सर्रास वापर केला जातो; मात्र इयरबड्सदेखील कानांसाठी अपायकारक ठरतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या कानांसाठी बड्स किती हानिकारक असतात, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

प्लॅस्टिकचे इयरबड्ससुद्धा काडेपेटीच्या काडीसारखंच काम करतात. त्यांचा वापर केल्यानं तुम्हाला थोडा आराम मिळतो; पण त्याने कानातला मळ पूर्णपणे साफ होत नाही. तो मळ बाहेर निघण्याऐवजी पुन्हा आत ढकलला जातो. परिणामी इयर ड्रम (ear drum) किंवा ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो, त्याच्या जवळ तो मळ साठून राहतो. त्यामुळे पडद्याला इजा पोहचण्याची शक्यता असल्याचं अनेक अभ्यासांतून समोर आलं आहे. एका अभ्यासात तर असंदेखील म्हटलं आहे की, जेव्हा कानात जास्त मळ जमा होतो, तेव्हा तो आपोआप निघून जातो. त्यासाठी इयरबड्सचा वापर करण्याची गरज पडत नाही.

तसं पाहायला गेलं, तर कानातला मळ आपल्या कानासाठी खूप फायदेशीर असतो. आपल्या कानासाठी एका संरक्षक जाळीचं काम हा पदार्थ करतो. शिवाय संसर्गासारख्या गोष्टींनादेखील तो प्रतिबंधित करतो. म्हणून कानात थोडाफार मळ असणंदेखील आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला कानाच्या काही समस्या असतील, तर तुम्ही घरीच उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांशी नक्की संपर्क साधावा. अंघोळ करतानाच कान साफ करणं हा सर्वांत उत्तम पर्याय आहे.

( टीप ; सादर माहिती ही सामान्य आहे, कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *